बीड : भारतातील बंजारा समाजाचे आणि गोर गरीब वंचित असलेल्या ओबीसी, भटक्या आणि बहुजन समाजाचे थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाशिम जिल्ह्याचे नामांतर करुन संत सेवालाल नगर असे नामकरण करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ॲड. शरद चव्हाण यांनी केली आहे.
बंजारा समाजासह अठरा पगड जातीच्या लोकांना विज्ञानाच्या वाटेवर चालण्याचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न सेवालाल महाराज यांनी केला आहे. सेवालाल महाराज यांनी समाजातील वाईट चालीरितीच्या विरोधात काम केले, त्याचप्रमाणे या समुदायाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
भारतातीलच नव्हे तर देशातील बंजारा समाज हा संत सेवालाल महाराज यांना आपले श्रद्धास्थान समजतो. महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या निर्णायक आहे. विदर्भात तर बंजारा समाज सर्वाधिक आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी या ठिकाणी सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी देशभरातील बंजारा समाज बांधव प्रत्येक वर्षी येऊन नतमस्तक होत असतो. तरी वाशिम जिल्ह्याचे नामांतर करुन संत सेवालाल नगर असे नामकरण झाले तर वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्राची मान अभिमानाने देशपातळीवर उंचावणार आहे. ज्या पद्धतीने मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामांतरासाठी पंधरा वर्षे आंदोलने करण्यात आली त्याच धर्तीवर आज पासून वाशिम जिल्ह्याचे नामांतर करुन संत सेवालाल नगर असे नामकरण करण्यासाठी लढा उभा केला जाणार असून या आंदोलनात बंजारा समाजाच्या बांधवासह सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन लढा सुरू करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य ॲड. शरद चव्हाण यांनी केले आहे.