छत्रपती संभाजीनगर : तालुकाच नव्हे तर राज्यातील विविध भागांमध्ये निवासाला असलेल्या गोर बंजारा समाज बांधवांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांचे (विद्यार्थ्यांचे) शैक्षणिक आणि कलागुणांचे सामाजिक स्तरावर कौतुक झाले तर त्यांना स्पर्धात्मक युगाला अधिक ताकदीने सामोरे जाण्याचे बळ मिळेल या हेतूने या वर्षाच्या शैक्षणिक सत्रात राज्यातील विविध माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणानुक्रमे प्राविण्य प्राप्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे गोर सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्ताभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला आहे.
भानुदास चव्हाण सभागृह छत्रपती संभाजीनगर येथे 30 जून रोजी समाजातील विविध क्षेत्रातील गणमान्य अतिथींच्या उपस्थितीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक 75 व 70% पेक्षा अधिक गुण मिळविणारे, नीट, सीईटी, राज्य व संघ लोकसेवा आयोगामध्ये यशस्वी झालेल्या तथा क्रीडा, साहित्य आणि इतर क्षेत्रात गोर बंजारा समाजाचा नावलौकिक केलेल्या विद्यार्थी व उमेदवारांचा सत्कार त्यांच्या पालकांसमवेत करण्यात येणार असल्याने राज्यातील अधिकाधिक यशस्वी प्रतिभावंतांनी या प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये काळाच्या कसोटीवर टिकणारे शिक्षणाच्या कुठल्या क्षेत्रात पदार्पण करावे यासंदर्भात उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे.
रविवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता भानुदास सभागृहात सत्कार सोहळा पार पडणार आहे. ही माहिती गोरसेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्ता राठोड यांनी दिली. गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच क्रीडा, साहित्य आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचाही गौरव करण्यात येणार आहे. सत्कार कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचेही आयोजन करण्यात आले असून सहभागी होण्याचे आवाहन दत्ता राठोड यांनी केले.