कल्याण : बंजारा समाजाचा मोठा वर्ग कल्याण, ठाणे जिल्ह्यासह आंबिवली या भागात अनेक वर्षांपासून स्थायिक असून, लहुजीनगर, आंबिवली (पूर्व) येथील असलेल्या "संत सेवालाल महाराज मंदिरासाठी २ गुंठे" जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन पत्र बंजारा समाजाच्या वतीने मा. आमदार नरेंद्र पवार यांना देण्यात आले आहे.
तसेच मा आमदार महोदयांनी बंजारा समाजातील समाज बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून लवकरच संत सेवालाल महाराज मंदिराच्या जागेची समस्या सोडवून समाज बांधवांना न्याय मिळवून देईल ! असे आश्वासन दिले.
संस्थेच्या वतीने निवेदन पत्रात म्हटले आहे की "बंजारा समाज सेवा संस्था" ही बंजारा समाजाची सामाजिक व सांस्कृतिक विकास घडवून येणेसाठी १९८० पासून कार्यरत आहे. सदर संस्थेची नोंदणी २००९ रोजी करण्यात आलेली आहे.
बंजारा समाजासाठी श्रेष्ठ मानले जाणारे दैवत "संत श्री. सेवालाल महाराज मंदिर" लहुजी नगर, मु. पो. मोहोने, आंबिवली (पूर्व), ता. कल्याण येथे १९८२ साली स्थापित मंदिर हे बंजारा समाजातील लोकांसाठी अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. सदर जागेवर असंख्य बंजारा समाजाचे लोक एकत्र येऊन नित्यनियमाने पूजा प्रार्थना करीत असतात. सदर मंदिरात १९८२ पासूनच बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात व जोमाने प्रत्येक वर्षी दि. १५ फेब्रुवारी रोजी साजरा करतात. तसेच रामनवमी उत्सव सुद्धा सदर ठिकाणी साजरा करीत असतात. या ठिकाणी संपूर्ण ठाणे जिल्हा येथील बंजारा समाजाचे लोक हजारोच्या संख्येने पूजा प्रार्थना करतात म्हणून सदर ठिकाण बंजारा समाजासाठी पवित्र मानले जाते.
संत श्री. सेवालाल महाराज मंदिराची स्थापना मोकळ्या जागेत १९८२ साली झालेले असून सुद्धा, सदर मंदिराचे पक्के बांधकाम आजतागायत होऊ शकले नाही. मोहोने, यादव नगर, अटाळी, वडवली, आंबिवली येथे बंजारा समाजाची लोकसंख्या हे हजारोच्या संख्येने आहे व त्यांना आंबिवली या क्षेत्रात पूजेसाठी व त्याचे धार्मिक कार्यक्रम साजरा करणेसाठी सदर ठिकाण हे एकमेव आहे. म्हणून सदर मंदिराचे पक्के बांधकाम समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक आहे. जेणेकरून बंजारा समाजाचे लोक एकत्रित येऊन त्यांचे सण / उत्सव आनंदाने साजरा करू शकतील. सदर मंदिराच्या बाजूला बंजारा वस्ती १९६५ पासून अस्तित्वात आहे. तसेच मा. श्री. हरिभाऊ राठोड, भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आल्यावर सदर मंदिराचे पुनः उद्घाटन केले होते. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मंदिराचे पक्के स्वरूपात बांधकाम होऊ शकले नाही. त्यानंतर २००९ या वर्षी कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त गोविंद राठोड साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले परंतु बंजारा बांधवांच्या वाट्याला अपयशच आले.
बंजारा समाजातील काही समाजबांधव हे एन आर सी कंपनीत कामगार म्हणून काम करत होते, त्यावेळेस कंपनीने कामगारांना तसेच वस्तीतील समाज बांधवांना सदर जागा वास्तव्यास दिली होती, त्याकाळात वस्तीत २ गुंठा जागा ही मोकळी असल्या कारणाने त्याठिकाणी समाज बांधवांनी संत सेवालाल महाराज व आई जगदंबा मातेचे एक छोटे खानी मंदिराची स्थापना केली. आता ती सदर जागा उद्योगपती मा. अदानी साहेबांच्या ताब्यात आहे, तरी साधारणतः २ गुंठा जागा संत श्री सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिराची ही जागा "बंजारा समाज सेवा संस्थेच्या" ताब्यात मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.
तसेच मा. आमदार नरेंद्र पवार यांना निवेदनाचे पत्र देताना विठ्ठल राठोड, कैलासभाऊ तंवर, प्रदीप तंवर, विजय राठोड, कैलास पवार, धनराज राठोड व पत्रकार सतिष एस राठोड हे उपस्थित होते.